खारेपाटण (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० अंतर्गत शाळांच्या गुणवत्ता सुधारणेसाठी CBSE पॅटर्न च्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशूरन्स फ्रेमवर्क अर्थात ‘स्क्वॉफ’ (SQAAf) या समितीने आज मंगळावर दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मॉडेल स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेला सदिच्छा भेट दिली.
या ‘स्क्वॉफ’ मूल्यमापन समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर, खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, शेर्पे हायस्कूल चे मुख्याध्यापक हिदायत अत्तार, प्राथमिक शिक्षक संदीप कदम,श्री. शिंगारे यांचा समावेश होता. या सर्व समिती सदस्यांचे खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी व विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनवण्यासाठी आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करणाऱ्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या समितीने शाळेला भेट दिली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ‘स्क्वॉफ’ (SQAAf) या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या भौतिक सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील जाणून घेतली.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, शीतल राठोड, सहाय्यक शिक्षक आरती जोजेन, समिधा राऊत, दीपिका चव्हाण, शिवलीला निडसोसी, श्रीम. चौधरी, अबिदा काझी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. तर शाळेच्या एकूणच कामकाज बाबत समितीने समाधान व्यक्त करत शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या कामाचे कौतुक केले.










