सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-गोठा वडेवाडी परिसरात बेकायदेशीरपणे बैलांची झुंज लावणाऱ्या चौघांविरुद्ध सावंतवाडी पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळवडे येथील गोठा वडेवाडी परिसरात पाळीव बैलांची झुंज लावली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता प्राण्यांना क्रूरतेने वागवून त्यांची झुंज लावली जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तात्काळ कारवाई करत संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार मंगेश लक्ष्मण शिंगाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी म्हणून उमेश सावंत (रा. पेंडूर मातोंड, ता. वेंगुर्ला), ओमकार रेडकर (रा. तळवडे गोठावडे, ता. सावंतवाडी), मोहन जोशी (रा. नेरूळ ठाकूरवाडी, ता. कुडाळ) आणि शरद आसोलकर (रा. बाव गाळववाडी, ता. कुडाळ) यांची नावे नमूद आहेत. सदर आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज शिंदे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. पाळीव प्राण्यांना क्रूरतेने वागवणे किंवा त्यांच्या झुंजी लावणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा असून सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा घटना कोठे घडत असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.










