वैभववाडी (प्रतिनिधी) : विधवा व घटस्फोटीत महिलांना विवाह नोंदणी करून विवाह नोंदणी दाखला देण्यात यावा. तसेच यापूर्वी झालेले बालविवाह यांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी विकास प्रबोधिनी संस्था सिंधुदुर्ग यांनी वैभववाडी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
कोरो मुंबई या संस्थेच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांमध्ये महिला संपत्ती अधिकार याविषयी विकास प्रबोधिनी संस्था काम करीत आहे. घर व इतर संसाधने यावर कायद्याच्या तरतुदीनुसार महिलांना अधिकार प्राप्त व्हावा. यासाठी संयुक्त घरमालकी, विवाह नोंदणी, हक्क सोडपत्र, महिलांची सातबारा सदरी नोंद याकरिता काम करीत आहे. महिलांना सासरकडील हक्क मिळवण्यासाठी विवाह नोंदणीची गरज अत्यंत गरजेचे असते संस्था म्हणून गेली २६ वर्ष गावागावांमध्ये जाऊन विवाह नोंदणी करीत आहोत. त्या अनुभवानुसार विधवा परितक्त्या व घटस्फोटीत महिला यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास अत्यंत अडचणी येतात. महाराष्ट्र राज्य पातळीवर प्रयत्न केल्यानंतर विधवा, घटस्फोटीत यांना नोंदणी मिळते परंतु अजून परितक्त्या महिलांना विवाह नोंदणी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा महिलांकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्याने त्यांची विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांना प्रमाणपत्र मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी उपयोयोजना करावी. तसेच यापूर्वी झालेले बालविवाह यांना कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर शासन पातळीवर विचार विनिमय करण्यात यावा व अशा महिलांना न्याय देण्यात यावा, अशीही मागणी सदर संस्थेने केली आहे. यावेळी विशाखा चव्हाण, प्रतिभा चव्हाण, साक्षी भुतारणे, माधुरी कांबळे, अनुया कुलकर्णी, प्रमिला देवरुखकर आदी विकास प्रबोधिनीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.










