माता-बाल आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी सिसिडीटी संस्थेला ‘सिएसआर हॅट सोसिओ स्टार अवॉर्ड 2025 प्रदान’

खारेपाटण (प्रतिनिधी) : भिवंडी व मालेगाव येथे माता-बाल आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कमिटेड कम्युनिटीज डेवलपमेंट ट्रस्ट (CCDT) या संस्थेला नुकताच ‘सिएसआर हॅट सोसिओ स्टार अवॉर्डस 2025’ अंतर्गत महिला सक्षमीकरण, आरोग्य व कल्याण (Women Empowerment, Health & Well-Being) या श्रेणीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सिसिडिटी संस्थेने सन – २०२० ते २०२५ या कालावधीत भिवंडी व मालेगाव परिसरात माता-बाल आरोग्य प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश गर्भावस्थेतील (Ante-natal) व प्रसूतीनंतरच्या (Post-natal) काळातील काळजीबाबत जनजागृती वाढवणे, माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, घरगुती प्रसूतीचे प्रमाण घटवणे तसेच बालकांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढवणे हा होता.

या प्रकल्पाच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी सिसिडीटीने एका बाह्य संस्थेमार्फत इम्पॅक्ट स्टडी करून घेतला होता. या अभ्यासातून लसीकरणाचे प्रमाण वाढले असून मातांमध्ये लसीकरण, पोषण आहार व आहाराच्या सवयीं बाबतचे ज्ञान लक्षणीयरीत्या वाढल्याचे तसेच आहाराच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे स्पष्ट झाले. तर या प्रकल्पाशी संबंधित सर्व अहवाल, माहिती-शिक्षण-संवाद (IEC) साहित्य, व्हिडिओ व डेटा CSR HAT संस्थेकडे सादर करण्यात आला होता. महाराष्ट्रभर महिला सक्षमीकरण व आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये CCDT ची निवड झाली.

हा सन्मान मिळण्यामागे CCDT च्या Managing Trustee सुकन्या पोद्दार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच भिवंडी व मालेगाव येथील समर्पित फील्ड टीमचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. कोविड-१९ महामारीच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही या टीमने धार्मिक नेते, ICDS कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच थेट माता व कुटुंबीयांसोबत समन्वय साधत प्रभावीपणे काम केले. या कार्याच्या यशस्वी परिणामस्वरूप CCDT ला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला असून, हा पुरस्कार संस्थेने आपल्या फ्रंटलाईन वर्कर्सना समर्पित केला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा दि. २० डिसेंबर २०२५ रोजी अंधेरी येथील कोहिनूर कॉन्टिनेंटल हॉटेल येथे पार पडला. सिसीडीटी संस्थेच्या वतीने समुदाय उपक्रम प्रमुख रामचंद्र अडसुळे आणि प्रकल्प समन्वयक निता जगताप यांनी पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुमारे ६२ स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला असल्याची माहिती समुदाय उपक्रम प्रमुख राम अडसुळे यांनी दिली.

error: Content is protected !!