दोडामार्ग (प्रतिनिधी) : येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यकांत परमेकर यांचे दुकान बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे पत्र्याचे शटर तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र शटर न उघडल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि मोठी चोरी टळली.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच संतप्त व्यापारी व नागरिकांनी थेट दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. शहरातील अनेक ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याबाबत नागरिकांनी पोलिसांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र वरिष्ठांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची कबुलीही यावेळी पोलिसांनी दिली.
गेल्या १५ ते २० दिवसांत दोडामार्ग शहर व तालुक्यात चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तथापि, अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. त्यामुळे चोरट्यांना जेरबंद करण्यात दोडामार्ग पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक व व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे शहरातील पिंपळेश्वर चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. वारंवार मागणी करूनही सीसीटीव्ही सुरू न केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या चोरींचा तपास अद्याप रखडलेला असून, त्यामुळे “पोलिस प्रशासन झोपेत आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी दिला आहे.










