सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाथपंथी गोसावी समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
चौके (अमोल गोसावी) : “विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही छान प्रगती करताय, पण शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसूदे तर संस्कार कमवण्यासाठी आणि सजग होण्यासाठी घ्या आणि शिक्षणाने सुज्ञ व्हा. अभ्यासात किंवा शिक्षणात जेवढं सातत्य ठेवाल तेवढीच तुम्हाला प्रगती मिळत जाईल. आपण सर्वजण भाग्यवान आहोत कारण कीं आपण गोसावी नाथ सामाजात जन्म घेतला आहे. त्यामुळे यशस्वी झाल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करा. किमान एक तरी असे काम करा जे समाजाप्रती असेल. गावामध्येही रोजगाराच्या अनेक संधी आहेत फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत. गाव जरी छोट असलं तरी गावात माणूस सापडणं सोपं असत उलट शहरात माणूस हा हरवत जातं. शहरांत झगमगाट आहे मोठमोठया इमारती आहेत मोठी स्वप्नही आहेत पण तेवढीच आव्हानं आहेत, ताणतणाव आणि आजारपणही आहे. मलाही लहानपणा पासून मलाही गावाबद्दल आकर्षण आहे. कोरोना काळात गावी राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी गावातील लोकांनी शेती सोडलेली आणि तरुणांचं शहरांत होत असलेलं स्थलांतर पाहून वाईट वाटलं. त्यावेळी गावीच राहून काहीतरी करण्याचा निश्चय केला. अबुंगू रॅबिट फॉर्म च्या माध्यमातून मी व्यावसायिक ससेपालन करत आहे. सध्या आमच्या सिंधुदुर्गमध्ये 24 शाखा आहेत आणि या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या काळात गोसावी समाजातूनही अनेक व्यावसायिक उभे करण्याचा आमचा मानस आहे.” असे प्रतिपादन कुडाळ निरूखे येथील उद्योजक तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निलेश नारायण गोसावी यांनी यांनी कुडाळ येथे बोलताना केले.

नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आणि वार्षिक स्नेहमेळावा गुरुवार २५ डिसेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बोलताना निलेश गोसावी यांनी वरील उद्गार काढले. यावेळी व्यासपीठावर नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा कोकण विभाग नाथपंथी महासंघाचे कार्याध्यक्ष विनोद गोसावी, सदगुरु नाथपंथी गोसावी समाज रत्नागिरीचे अध्यक्ष कृष्णा बाबू गोसावी, ज्योतिषालंकार बाळ गोसावी (चिंदर), शिवसंघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मयूर गोसावी, खजिनदार स्वप्निल गोसावी, नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ उपाध्यक्ष साईनाथ गोसावी, सचिव सदानंद गोसावी, सल्लागार शरद गोसावी, चंद्रकांत गोसावी गुरुजी, संदिप गोसावी, झिलू गोसावी महिला कार्यकारीणी अध्यक्षा स्नेहा गोसावी, विनया गोसावी, सुलभा गोसावी, श्वेता गोसावी, नेहा गोसावी, आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नाथ बांधव भगिनींनी हजेरी लावली होती.

यावेळी स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचा मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका रुचिका प्रभाकर गोसावी (फोंडा) आणि समाजकल्याण विभागातून चालक पदावरून सेवानिवृत्त झालेले प्रकाश कृष्णा गोसावी (पणदूर) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दहावी बारावी, पदवी, पदव्यूत्तर, तसेच विविध स्पर्धा परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी उपस्थित महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमही घेण्यात आला.

यानंतर मार्गदर्शन करताना मुंबई मंडळाचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी सांगितले कीं, समाजाकडून गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांनी नोकरी व्यवसायात गेल्यानंतर आपल्या समाजाकडे मागे वळून पहावं. तरुण तरुणी आईवडिलांचा, समाजाचा विचार न करता आंतर जातीय विवाह करत आहेत ही मोठी समस्या झाली आहे. यामुळे आपल्या समाजातील तरुणांना वधू मिळत नाहीत किंवा मुलींना वर मिळत नाहीत. त्यामुळे वय निघून गेले तरी विवाह होत नाहीत. यामुळे समाजातील तरुण तरुणीनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. यासाठीच मंडळाने वधुवर मेळावे सुरु केले आहेत. आता कोकण महासंघाच्या माध्यमातून विभाग स्तरावर वधुवर मेळावा घेतला जाणार आहे. कोकण महासंघ स्थापन करण्यामागे आपल्या नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळाचा सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात आपला समाज मोठया प्रमाणावर आहे त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांना निमंत्रित करून आपल्या मागण्या पूर्ण करून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या नाथसांप्रदायाला मानणारे अनेकजण आहेत. आपलं मुंबई मंडळ आपल्या समाजासाठी असलेले आरक्षण वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असे सांगतानाच महिला जिल्हा कार्यकारिणीच्या कार्याबद्दल कौतुक केले.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी खचून व्यसनांच्या आहारी न जाता प्रत्येक परिस्थितीला धीराने तोंड द्यावे असे आवाहन केले आणि यशस्वी झाल्यानंतर आपल्या समाजासाठी आवर्जून कार्य करावे असे सांगितले. सदर स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ सिंधुदुर्गचे सर्व कार्यकर्ते तसेच जिल्हा महिला कार्यकारिणीच्या सर्व महिला सदस्या यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झिलू गोसावी यांनी केले तर आभार संदिप गोसावी यांनी मानले.










