तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षण व बालसंस्कार क्षेत्रात अनेक दशके मोलाचे योगदान देणाऱ्या देवगड येथील ज्येष्ठ शिक्षणसेविका श्रीम. सुशीला दिनकर जोशी यांना शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ०१ एप्रिल १९३२ रोजी जन्मलेल्या श्रीम. सुशीला जोशी यांनी देवगड कन्या शाळेतून सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. देवगड तालुक्यात लहान मुलांच्या शिक्षणाची कोणतीही व्यवस्था नसताना ग्रामस्थांच्या विनंतीवरून त्यांनी सन १९६६ च्या सुमारास बालसंस्कार केंद्राची स्थापना केली. या केंद्राच्या माध्यमातून देवगड परिसरात शैक्षणिक चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. वैयक्तिक लक्ष, कठोर शिस्त व विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती यांमुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणातील लेखन, वाचन व मूलभूत कौशल्यांचा भक्कम पाया त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हून अधिक विद्यार्थी घडले असून आज ते डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. डॉ. सुनील आठवले, अॅड. शामसुंदर जोशी, प्रसिद्ध व्यापारी प्रमोद नलावडे यांसारखे अनेक मान्यवर त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आहेत.
जवळपास ३५ ते ४० वर्षे त्यांनी अखंडपणे शिक्षणसेवा दिली. लोकांच्या सहकार्यामुळे हे कार्य यशस्वीरीत्या पार पाडता आले, असे त्या विनम्रपणे नमूद करतात. आजही त्या विद्यार्थ्यांना स्वअध्ययन, स्वशिस्त आणि स्वावलंबनाचा संदेश देतात. आज ९३ व्या वर्षीही त्या स्वावलंबी जीवन जगत असून नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
शिक्षण, संस्कार व समाजघडणीत दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 3 जानेवारी रोजी दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा सचिव समीर परब आणि महिला आघाडी अध्यक्षा सुष्मिता चव्हाण यांनी केली.

श्रीम. सुशीला जोशी










