कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे बंडवाडी हेळ्याचा हिराव येथे कासार्डे गावातील अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी एकत्र येत ओढ्यावर वनराई बंधारा उभारून जलसंधारणाचा आदर्श उपक्रम राबविला आहे. सध्या उन्हाच्या तीव्र झळा वाढत असून पाण्याची पातळी सातत्याने खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाणी साठवणे व भूजल पातळी वाढवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. या उद्देशाने स्थानिक पातळीवर पुढाकार घेत हा वनराई बंधारा बांधण्यात आला.

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ठेवून त्याचा साठा वाढवणे, जमिनीत मुरवून भूजल पातळी उंचावणे आणि आसपासच्या परिसरात ओलावा टिकवणे, हा या वनराई बंधाऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेल तसेच ओढ्यांतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच वनचर, पशुपक्षी यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून आणि पर्यावरण जपण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल कासार्डे गावातील अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.











