कन्हैया पारकर हे ‘शकुनीमामा’!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा घणाघात; कणकवलीत राजकीय घमासान

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना ‘धृतराष्ट्र’ अशी उपमा देणारे ठाकरे गटाचे कणकवलीतील पदाधिकारी कन्हैया पारकर हे प्रत्यक्षात कणकवलीतील ‘शकुनीमामा’ म्हणून ओळखले जात असल्याचा घणाघाती आरोप भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केला आहे. याच भूमिकेमुळे नगरपंचायत निवडणुकीत कन्हैया पारकर यांना साधी उमेदवारीही देण्यात आली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात कोदे यांनी सांगितले की, यापूर्वी कन्हैया पारकर यांनी नगरपंचायत कार्यालयातून माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे सुपुत्र नारायण राणे यांचे फोटो काढले होते. आता ‘राणेंची हरकत नसेल तर फोटो लावू’ असे म्हणणे म्हणजे जनतेची सरळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. नारायण राणे साहेब स्वतः कन्हैया पारकर यांच्याकडे येऊन आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत, तसेच पारकर इतके मोठे नेते नाहीत की त्यांनी राणेसाहेबांवर बोलावे, असा टोकाचा हल्लाही कोदे यांनी चढवला.

भाजपा शहराध्यक्ष या नात्याने स्पष्टपणे सांगतो की, नारायण राणे यांचा नगरपंचायत कार्यालयात फोटो लावण्यास कोणतीही हरकत नाही. देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात मोलाचे योगदान असलेले नेतृत्व म्हणून त्यांचे फोटो लावण्यात आले होते, असे कोदे यांनी स्पष्ट केले. असे फोटो काढून त्यांचा अपमान करणे आमदार निलेश राणे यांनाही मान्य होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. नगराध्यक्ष दालनात नारायण राणे यांचे फोटो लावायलाच हवेत. यासाठी परवानगी, सीओंची मंजुरी अशा भंपक व खोट्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवू नयेत, असा इशाराही कोदे यांनी दिला. आधी फोटो काढायचे आणि नंतर लावायला हरकत आहे का, अशी विचारणा करणे म्हणजे उघडपणे डबल ढोलकीगिरी असल्याची टीका त्यांनी केली.
ज्या नारायण राणे यांच्या माध्यमातून कन्हैया पारकर यांच्या भावाला राजकारणात संधी मिळाली, ज्यांनी त्यांना लाल दिवा दिला, त्या राणेसाहेबांचा फोटो लावायलाही पारकर कुटुंब तयार नाही, हा कृतघ्नतेचा कळस असल्याचा आरोप कोदे यांनी केला. निलेश राणे यांच्या पाठिंब्यामुळे नगराध्यक्षपद मिळवून काही तासांतच भूमिका बदलणे, ठाकरे गटाच्या व्यासपीठावर जाणे, एकनाथ शिंदे यांची भेट घेणे आणि पुन्हा वेगळ्याच दिशेने वाटचाल करणे, हा पारकर यांचा जुना इतिहास असल्याचेही त्यांनी सांगितले.

कणकवलीकरांना ही सवय चांगलीच माहिती असून मालवणी भाषेत अशा प्रवृत्तीला ‘उंडग्या ढोर’ असे म्हटले जाते, असा शब्दप्रयोग करत कोदे यांनी संताप व्यक्त केला. नारायण राणे यांचा फोटो लावून उपकारांची परतफेड होणार नसली, तरी किमान कृतघ्न न होता कृतज्ञता दाखवावी, असे आवाहन करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

error: Content is protected !!