कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुशांत नाईक यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सिंधुदुर्ग नेते तथा भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्षपदी आणि नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल सत्कार केला.
संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्या मैत्रीचे नाते अतूट आहे. पक्ष जरी भिन्न असले तरीसुद्धा संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध कायम राहिले आहेत. सुमारे सहा ते साडे सहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीत कार्यरत असणारे संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तत्कालीन शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला होता. तर एप्रिल २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या पराभवानंतरच्या चिंतन बैठकीमध्ये अतुल रावराणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम ठोकला होता. मात्र असे असले तरीसुद्धा अतुल रावराणे आणि संदेश पारकर व सुशांत नाईक यांचे मैत्रीपूर्ण नाते कायम होते. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्षपदी १४५ मतांनी विजयी होत नगराध्यक्ष बनलेल्या संदेश पारकर यांचा तसेच अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या प्रभाग क्रमांक १७ मधील निवडणुकीमध्ये नगरसेवकपदी मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या सुशांत नाईक यांचाही अतुल रावराणे यांनी मैत्रीपूर्ण सत्कार केला.










