देवगड (प्रतिनिधी) : आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या दृष्टीने नव्हे, तर समाजासाठी उपयोगी पडेल असे शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा एक अधिकारी व नागरिक म्हणून मी व्यक्त करतो, असे मत देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी व्यक्त केले.ते मिठबाव येथील छात्रकुलोत्पन्न समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी महोत्सव व अध्यापक महाविद्यालय, मिठबावच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. ही संस्था अशीच शिक्षणाची ज्योत पिढ्यान्पिढ्या उजळत राहो व येथील विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल होवो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या सेवाकालाविषयी बोलताना तहसीलदार पवार म्हणाले की, मला या गावात तलाठी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे पदोन्नतीच्या माध्यमातून नायब तहसीलदार व तहसीलदार या पदापर्यंत काम करता आले, हे मी माझे भाग्य समजतो. या शताब्दी व अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी संस्थेने मला आमंत्रित केले, याबद्दल मी ऋणी आहे.संस्थेच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अध्यापक महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रात शिस्त व गुणवत्तेचा आदर्श निर्माण केला आहे. येथून तयार झालेले शिक्षक ज्या ठिकाणी जातात, तेथे नवे आदर्श उभे करतात. संस्थेच्या पत्रव्यवहारातील तांत्रिक अडचण तत्काळ सोडविण्यास संस्थेने दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी छात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, मिठबाव सरपंच भाई नरे, विश्वस्त अंकुश डगरे, भीमसेन आचरेकर, भाऊ डगरे, चंद्रशेखर फाटक, धर्माजी गावकर, रामचंद्र वाळके, रवींद्र कुवेसकर, माजी सभापती भाई पारकर,आबा लोके, बी.एस.डब्ल्यू. अमोल लोके, एम.के.लोके, बी. के.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले,तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक आर.आर.राऊत यांनी मानले.










