सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलचा देशात प्रथम क्रमांक

लोकसंगीत समूह वाद्यवादन प्रकारात विद्यार्थ्यांनी रोवली विजयाची मोहोर

खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने दि.२० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशदा, बाणेर रोड,पुणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कला उत्सव २०२५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय,खारेपाटण या प्रशालेच्या संघाने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत संपूर्ण भारत देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून सिंधुदुर्ग तसेच,महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयाच्या या यशस्वी कामगिरी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या या कलाउत्सव स्पर्धेत एकूण १२ कलाप्रकार समाविष्ट होते. त्यामध्ये लोकसंगीत समूह वाद्यवादन या कलाप्रकारात शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण च्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला. राष्ट्रीय स्तरावर एकूण ३७ संघ संपूर्ण भारतातून या स्पर्धेसाठी समाविष्ट झाले होते. या वादन समूहामध्ये कुमारी आर्या अनिल मोसमकर, कुमार आयुष प्रशांत मांगले, कुमार सुमित रवींद्र ठोसर व कुमार वंश मारुती कानडे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. जिल्हा, विभाग, राज्य या सर्व स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून हा संघ राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला होता.आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही संघ या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले होते पण त्यांना यश मिळाले नव्हते आणि ही उणीव खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी भरून काढल्याबद्दल संपूर्ण कलाकारांच्या वतीने त्यांचे जल्लोषपूर्ण अभिनंदन करण्यात येत आहे.

अत्यंत रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक झालेल्या या स्पर्धेच्या पारितोषक वितरण समारंभामध्ये भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये संजय कुमार सचिव, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, मा. प्रो.दिनेश सकलानी, संचालक, NCERT, रणजीत सिंह देओल, प्रधान सचिव, शालेय आणि क्रीडा मंत्रालय, महाराष्ट्र सरकार, डॉ. सुधांशू, संचालक, यशदा, सचिंद्र प्रताप सिंह, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शासन, राहुल रेखावर, संचालक, SCERT पुणे, सहसंचालक कमलादेवी आवटे,उपसंचालक अरुण जाधव यांचा समावेश होता.

खारेपाटण प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संघाने सर्वोत्तम कामगिरी केली. या कला प्रकारासाठी श्रीधर पाचंगे, प्रशालेचे माजी विद्यार्थी मयूर जाधव,अक्षय कांबळे,धनंजय मोसमकर यांचे विशेष सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे एस्कॉर्ट टीचर म्हणून मनोहर म्हात्रे सर व वैशाली काकडे (मुंबई) यांनी चोख कामगिरी बजावली.

सर्व यशस्वी विद्यार्थी व संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय सानप,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेचे सर्व आजी माजी विद्यार्थी आणि खारेपाटण पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले .

error: Content is protected !!