‘सखोल वाचन ही काळाची गरज’ – प्राचार्य डॉ. राजाराम राठोड

ओरोस येथे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर वक्तृत्व स्पर्धा’ उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वृत्तपत्र हे केवळ बातम्यांचे साधन नसून ते समाज प्रबोधनाचे आणि ज्ञानार्जनाचे एक सशक्त माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगातही ‘सखोल वाचन’ ही काळाची गरज असून, बाळशास्त्री जांभेकर यांची ‘आचार्य’ व ‘शास्त्री’ या उपाध्या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या उंचीचे परिमाण आहे, असे प्रतिपादन राजापूर येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी केले.

जांभेकर कुटुंबीय व गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे आयोजित जिल्हास्तरीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रिया वालावलकर, गजानन जडये, ओरोस उपसरपंच पांडुरंग मालवणकर, अकॅडमीच्या संचालिका श्रद्धा ढोणुकसे, प्रा. एस. जी. ढोणुकसे आणि बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज विक्रम जांभेकर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतून आलेल्या स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गजानन जडये, जयवंत परब, सुप्रिया वालावलकर, धनश्री देऊसकर आणि प्रवीण सरवटे यांनी बक्षीस प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल प्रा. बाजीराव जांभेकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे :
​प्रथम क्रमांक : आर्या सत्यवान जोईल (न. शा. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड)
​द्वितीय क्रमांक : श्रावणी राजन आरावंदेकर (सातेरी हायस्कूल व जूनियर कॉलेज, वेतोरा)
​तृतीय क्रमांक : आदेश हिराकांत खानोलकर (राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी)
​उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते :
१) वेदांत शिवप्रसाद नाईक (ना. अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण)
२) साक्षी दत्तात्रय साळकर (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा)
३) समीक्षा सुभाष मर्गज (दादासाहेब वराडकर जुनियर कॉलेज, कट्टा)

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कणकवली कॉलेज विजयकुमार सावंत व ओरोस कॉलेजचे सुभाष बांबुळकर यांनी केले.

error: Content is protected !!