जीवन शिक्षण शाळेत मुलांनी घेतले अनोख्या ‘बबल प्रिंट आर्ट’चे धडे

चित्रकार नरेंद्र राणे आणि मनाली सुद्रिक यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील गोपुरी आश्रमाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत ‘बबल प्रिंट आर्ट’ या अभिनव कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीत बुडबुड्यांच्या साहाय्याने विविध सृजनात्मक चित्रे साकारत आपली कल्पकता आणि कलात्मकता सादर केली. गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत मुलांसाठी जीवनकौशल्ये, कला, निसर्ग आणि सृजनशीलतेशी संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, २८ रोजी गोपुरी आश्रमाच्या गणपतराव सावंत सभागृहात ‘बबल प्रिंट आर्ट’ कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

चित्रकार नरेंद्र राणे आणि मनाली सुद्रीक यांनी विद्यार्थ्यांना बबल प्रिंट आर्टची ओळख करून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले. रंगीत पाणी तयार करून स्ट्रॉच्या मदतीने बुडबुडे फुंकणे, त्यांचे ठसे कागदावर उमटवणे आणि त्या ठशांतून कलाकृती साकारण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः रंग तयार करून बुडबुड्यांच्या साहाय्याने आकर्षक चित्रे रेखाटली.

कार्यशाळेची विभागणी तीन गटांत करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बुडबुड्यांच्या ठशांतून राक्षस, फुलपाखरे, फुले यांसारखी कल्पक चित्रे साकारली. पाचवी ते सातवीच्या गटाने बबल प्रिंट आर्टचा व्यावहारिक वापर करत सजावटीची पाकिटे, शुभेच्छापत्रे व बुकमार्क्स तयार केले. तर आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘लेयर्ड लँडस्केप कोलाज’च्या माध्यमातून चित्रकलेचा अनुभव घेतला. कार्यशाळेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः साकारलेल्या चित्राबाबत माहिती देत आपले विचार व्यक्त केले. बबल प्रिंट आर्टच्या माध्यमातून बालचित्रकारांनी आपली सृजनशीलता, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास प्रभावीपणे मांडला.

या वेळी गोपुरी आश्रमाचे संचालक संदीप सावंत, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, विनायक सापळे, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि शिकत-खेळत कला अनुभवण्याची संधी देणारी ही कार्यशाळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

error: Content is protected !!