वनविभागाच्या वतीने रेस्क्यू ऑपरेशन करत माकडाला केले पिंजऱ्यात बंद

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नंबर १ येथील शालेय विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या रहदारी असणाऱ्या घाटी रस्त्यावर आज सोमवारी स. १०.३० च्या दरम्यान एक मृत तर एक जखमी अवस्थेतील पिसाळलेला माकड आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ माजली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी तात्काळ वनविभागाला खारेपाटण येथे बोलावून या जखमी अवस्थेतील माकडाला वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत पिंजऱ्यांमध्ये सुरक्षित जेरबंद केले.

याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटण बाजारपेठ येथे असलेल्या जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ च्या रस्त्यावर एक जखमी अवस्थेतील माकड आरडा ओरडा करताना शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांना आढळून आले. सदर माकडाच्या जबड्याला पूर्णतः जखम झाली होती. तर दुसरा माकड येथे असलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती लागत मृत अवस्थेत आढळून आले होते. ही माहिती शाळेचे मुखाध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शाळा समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांना सांगताच त्यांनी लागलीच वनविभागाला संपर्क करून जखमी माकडाचा बंदोबस्त करण्यास सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वतीने रेस्क्यू टीम १ तासात खारेपाटण येथे दाखल झाली व त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करीत अथक प्रयत्नांनी सदर जखमी माकडाला पिंजऱ्यामध्ये सुरक्षित जेरबंद करून पुढील वैद्यकीय उपचारसाठी त्याला फोंडाघाट येथे नेण्यात आले. तर दुसऱ्या आढळून आलेल्या मृत माकडाला देखील वनविभाग घेऊन जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या रेस्क्यू ऑपरेशन टीम मध्ये वनविभाग कणकवली बचाव कृती दलचे कर्मचारी नीलेश मोरये, रिदेश तेली, मयुर राणे, विठ्ठल बिडये तसेच खारेपाटण वनविभाग तपासणी वनरक्षक अविनाश राठोड यांचा सहभाग होता.










