काळसेतील अमृत नार्वेकर, उदय नार्वेकर,विनोद नार्वेकर या आरोपींना विशेष जिल्हा न्यायालयाचा दणका
सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मालवण तालुक्यातील काळसे गावात फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करून वाळूची डंपर ची माहिती देतोस काय असे विचारत मारहाण केल्या प्रकरणी आरोपी अमृत सुधाकर नार्वेकर, उदय सुधाकर नार्वेकर, विनोद नार्वेकर ( तिघे रा. काळसे बागवाडी ) या आरोपींचा अटकपूर्व जामीन विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला.फिर्यादीला 4 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता काळसे होबळी माळ तिठा येथे जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी वरील तिन्ही आरोपींविरोधात मालवण पोलीस ठाण्यात ऍट्रोसिटी ऍक्ट सह आयपीसी कलम 323, नु352, 504, 506, 34 नुसार 5 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास डीवायएसपी विनोद कांबळे करत आहेत. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपींनी विशेष जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता.त्याला हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी तिन्ही आरोपींचा पूर्वेतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आणून दिले, तसेच फिर्यादी हे अनुसूचित जातीचे असल्याचे माहीत असूनही आरोपीनी फिर्यादीला केलेली मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ समाजात तेढ निर्माण करणारी आहे, आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करायची आहे, आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे असून जामीन मिळाल्यास साक्षीदारांना धमकावून साक्ष देण्यापासून परावृत्त करु शकतात, साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी कायदेशीर कार्यवाही होऊनही त्यांनी आता गंभीर गुन्हा केला आहे, त्यामुळे त्यांना न्यायव्यवस्थेचा त्यांना आदर नसल्याचे दिसून येत आहे आदी मुद्दे सरकारी वकील देसाई यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. सरकारी वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत विशेष जिल्हा न्यायाधीश डॉ जोशी यांनी तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.