दीड वर्षापासून आहे जेलमध्ये
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) : मडगाव मधील मजुराला जिवंत जाळून मारल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शैलेश संजय तांबे रा असलदे ( बौद्धवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. कोकण रेल्वे कर्मचारी असलेल्या शैलेश तांबे यांनी कर्जाला कंटाळून स्वतःच्या हत्येचा बनाव केला होता. मात्र प्रत्यक्षात शैलेश याने गोव्यातील मडगाव येथील सलमान नामक मजुराला कोळोशी येथील एका शेतमांगरात दारू पाजून त्याला बेशुद्ध केले होते. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळून ठार मारले होते. आणि तो मृतदेह स्वतःचा असल्याचा बनाव केला होता. हा गुन्हा 2 ऑगस्ट 2021 रोजी घडला होता.गुन्हा उघडकीस आल्यानंतर आरोपी शैलेश वर 28 ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मागील 1 वर्ष 8 महिने आरोपी शैलेश तांबे हा जेलमध्ये आहे. त्याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्याला हरकत घेताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी आरोपीची क्रूर वृत्ती, गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग, पोलीस तपासात सापडलेला पुरावा आदी बाबी मांडत जामीन अर्जाला हरकत घेतली. तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी आरोपी शैलेश तांबे चा जामीन अर्ज फेटाळला.