महिलांना मोफत तर गरिबांवर अत्यल्प दरात नेत्र शस्त्रक्रियेची सुविधा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड नेत्र रुग्णालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्ररुग्णांसाठी नववर्षानिमित्त अत्यंत दिलासादायक उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गरजू महिलांसाठी नेत्रशस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. तर इतर गोरगरीब रुग्णांसाठी केवळ १००० रुपयांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. महिलांसाठीच्या मोफत शस्त्रक्रिया उपक्रमाला कोल्हापूर येथील इनरव्हीलच्या चेअरमन उत्कर्षा संग्राम पाटील यांचे विशेष आर्थिक सहकार्य लाभले आहे. नॅब रुग्णालयाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मोबाईल नेत्र तपासणी व्हॅन सध्या जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण आणि दोडामार्ग तालुक्यातील हजारो रुग्णांनी या व्हॅनद्वारे मोफत तपासणीचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक शिबिरे घेऊन हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, १००० पेक्षा जास्त यशस्वी फेको शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. या रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डोळ्यातील जाळी काढणे, नेत्रपडद्यावरील उपचार आणि सोनोग्राफी यांसारख्या आधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत उचगांवकर आणि सचिव सोमनाथ जिगजिन्नी यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.











