सिंधुदुर्गातील पत्रकारांचे हक्काच्या घराचे स्वप्न होणार साकार; ओरस येथे गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी

पत्रकार दिनी पालकमंत्री नितेश राणेंची मोठी घोषणा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पत्रकारांच्या हक्काच्या घराचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येत असून, ‘सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्था’च्या माध्यमातून ओरस–सिंधुदुर्गनगरी येथे पत्रकारांसाठी निवासस्थाने उभारली जाणार आहेत. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या गृहनिर्माण संस्थेसाठी भूखंड देण्याबाबतची अधिकृत मंजुरी (ऑर्डर) प्राप्त झाली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हा भूखंड प्रत्यक्ष संस्थेच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी दीर्घकाळ सातत्याने पाठपुरावा केला होता. यामध्ये माधव कदम, संतोष वायंगणकर, उमेश तोरस्कर, शशी सावंत, गजानन नाईक, बाळ खडपकर आणि संतोष राऊळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळे ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी साठे यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले की, केवळ भूखंड मिळवणे हे अंतिम उद्दिष्ट नसून, नियोजित पद्धतीने लवकरात लवकर घरे पूर्ण करून पत्रकारांच्या हातात घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा आपला संकल्प आहे. ‘सिंधू दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्था’ चे अध्यक्ष म्हणून संतोष राऊळ पुढील सर्व कामकाज, समन्वय आणि पाठपुरावा पाहणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

error: Content is protected !!