ग्राहकांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत विचारला जाब
आठ दिवसांत ग्राहकांच्या वसुली विषयक आक्षेपांचे निराकरण करण्याचे व्यवस्थापकांचे आश्वासन
कुडाळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुडाळ शिष्टमंडळाने आज चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक देत ग्राहकांच्या अवाजवी वसुलीविषयक तक्रारी व पिळवणुकीबाबत जाब विचारला. ग्राहकांना कर्जावर मारला जाणारा अवाजवी दंड व वसुलीतील अनियमिततांबाबत ग्राहकांनी मनसे कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार मनसे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकांना धारेवर धरत आठ दिवसात ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची सक्त ताकीद दिली. अन्यथा मनसे स्टाईल खळ खट्याक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला.दरम्यान तक्रारदार ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचताच कंपनीच्या व्यवस्थापकांनी तांत्रिक बाबींमुळे वसुलीमधील अनियमितता मान्य करत 10 मे पर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी राजेश टंगसाळी,बाबल गावडे,दिपक गावडे,सुंदर गावडे,वैभव धुरी,गजानन राऊळ, शुभम धुरी यासंह तक्रारदार ग्राहक उपस्थित होते.