वयाने वृद्ध झाला असला तरी मनाने तरुण राहणे गरजेचे – प्राची ईसवलकर

खारेपाटण येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा १९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा करण्यात आला सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : ज्येष्ठ होणे म्हणजे वृद्धापकाळाकडे वाटचाल होणे हे जरी खरे असले तरी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वयाने जरी वृद्ध झाला असला, तरी मनाने तरुण राहणे काळाची गरज असल्याचे भावपूर्ण उद्गार खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ खारेपाटणच्या १९व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.

खारेपाटण, शिवाजीपेठ येथे संपन्न झालेल्या या ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वर्धापन दिन तथा मेळावा कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटणकर, खारेपाटण गट विकास सोसायटीचे संचालक सुरेंद्र कोरगावकर, सिं. जि. म. सहकारी बँक शाखा खारेपाटणचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी सुरेश गोडवे, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक श्री. कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी संघटनेच्या ज्या सभासदांचे निधन झाले, त्यांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटणकर यांनी वयाची ९० वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरपंच प्राची ईसवलकर यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तर संघटनेच्या ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिला व पुरुष सभासदांचा तांब्या, पेला तर ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या सभासदांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुषगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी हक्काची व स्वतंत्र कार्यालयासाठी जागा खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी सरपंच प्राची ईसवलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मेळाव्यात दिले. यावेळी पत्रकार संतोष पाटणकर, भिडे गुरुजी, सेवानिवृत्त हवालदार श्री. खांडेकर, कुबल गुरुजी यांनी आपली मनोगते व्यक्त करून ज्येष्ठ नागरिक मेळाव्याला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुबल गुरुजी यांनी केले. तर आभार सुरेंद्र कोरगावकर यांनी मानले.

error: Content is protected !!