वैभव मालंडकर यांची नगराध्यक्ष पारकर यांच्याकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना परिसरात नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध बंधारा बांधा अशी मागणी समाजसेवक वैभव मालंडकर यांनी कणकवलीचे नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गणपती साना परिसरात नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असलेला पाणीसाठा सध्या योग्य नियोजनाअभावी पूर्ण क्षमतेने वापरात येत नसल्याचे मालंडकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पाण्याचा हा मौल्यवान स्रोत योग्यरीत्या व्यवस्थापित न केल्यास भविष्यात परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, सदर ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने बंधारा उभारल्यास पावसाळ्यात साठणारे पाणी दीर्घकाळ टिकून राहील आणि जलसाठा क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. बंधारा बांधताना सध्या साचलेला गाळ नियोजनबद्ध पद्धतीने डिसिल्टिंग करून काढण्यात यावा, जेणेकरून पाणीसाठ्याची खोली व साठवण क्षमता वाढेल,तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विचार करता, कपडे धुण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा निर्माण कराव्यात, तसेच गुरे व जनावरे धुण्यासाठी वेगळी जागा निश्चित केल्यास मानवी वापराच्या पाण्याचे प्रदूषण टाळता येईल,पावसाळ्यानंतरही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहावा आणि भविष्यात नगरपंचायतीवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी व्हावा, यासाठी गणपती साना येथे बंधारा उभारणे अत्यंत आवश्यक आहे.बंधाऱ्याची रचना करताना सार्वजनिक स्वच्छता, नागरिकांची सुरक्षितता आणि पर्यावरणीय संतुलन यांचा समतोल साधत काम टप्प्याटप्प्याने राबवावे, अशीही मागणी करण्यात आली.
या बंधाऱ्याच्या उभारणीमुळे गणपती साना परिसरासह आजूबाजूच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून पाण्याचा शाश्वत, सुरक्षित आणि योग्य वापर सुनिश्चित होईल. त्यामुळे नगरपंचायतीने या महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी समाजसेवक वैभव मालंडकर यांनी केली आहे.












