कणकवली (प्रतिनिधी) : “समाजबंध” ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था असून ती प्रामुख्याने मासिक पाळी, आरोग्य व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. या संस्थेमार्फत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘समता संवाद यात्रा’ कोकण विभागातील मोजक्या शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
वार- गुरुवार, दिनांक- ८ जानेवारी २०२६ रोजी समता संवाद यात्रा कार्यक्रम माध्यमिक विद्या मंदिर कनेडी प्रशालेत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण यांनी मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत लिंग, जात, धर्म आधारित समता म्हणजे काय? आणि विषमतेची ओळख, समता प्रस्थापित करण्यासाठी उचलता येईल अशी पावले, युवा म्हणून आपली जबाबदारी, दररोजच्या आयुष्यात मुल्यधारित वर्तन यावर आधारित कृतिशील संवाद साधत विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहा.शिक्षक प्रसाद मसुरकर तर, पाडू चला रे भिंत ही आड येणारी….. या प्रोत्साहन गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












