शिवसेना (उबाठा) महिला संघटक हर्षा ठाकुर यांचा तन्वी चांदोस्करांवर आराेप
देवगड (प्रतिनिधी) : कोर्ले–सातंडी प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेसाठी यापूर्वी नियुक्त करण्यात आलेली पीएमसी ही महाराष्ट्र शासनाची (महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) असताना ती बदलून खासगी पीएमसी नेमण्यात आली. हा बदल जनहितासाठी नसून देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांच्या वैयक्तिक टक्केवारी व कमिशनसाठीच करण्यात आल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला तालुका संघटक हर्षा ठाकुर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
सौ. ठाकुर यांनी म्हटले आहे की, या योजनेसाठी मंजूर असलेल्या ९ कोटी २१ लाख रुपयांच्या निधीतून कमिशन मिळवणे हेच सभापतींचे मुख्य उद्दिष्ट असून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा देणे हा त्यांचा हेतू नाही. या योजनेसाठी १० टक्के लोकवर्गणी म्हणजेच सुमारे ९२ लाख रुपये जनतेकडून जमा करण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देवगड–जामसंडेच्या जनतेकडून यापूर्वी माजी आमदार स्व. आप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यकाळात तत्कालीन ग्रामपंचायतींमार्फत लोकवर्गणी गोळा करण्यात आली होती. मात्र त्या निधीचा आजतागायत हिशेब जनतेसमोर मांडण्यात आलेला नसल्याकडेही सौ. ठाकुर यांनी लक्ष वेधले. तसेच शिरगाव–पाडागर पाणी योजनेचे विद्युत बिल थकीत असल्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याची माहिती देत नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
याशिवाय, सभापतींचे पती नगराध्यक्ष असताना १२ जुलै २०१८ रोजी देवगड–जामसंडे शहराला दररोज पाच लाख लिटर पाण्याची गरज नाही, असा ठराव स्वतःच्या सहीने मंजूर करण्यात आला होता, असा गंभीर दावा त्यांनी केला. त्या काळात नागरिकांची सभा घेऊन चर्चा न करता चुकीची माहिती देऊन सभागृहाचीही दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागील नऊ वर्षांत दहिबाव नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च करण्यात आले, मात्र हा निधी नेमका कुठे गेला, याचा खुलासा प्रथम करावा, अशी मागणी सौ. ठाकुर यांनी केली. एका लिकेजसाठी अंदाजपत्रकात सुमारे १४ हजार रुपये प्रति लिकेज या दराने रक्कम काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सभापतींनी पंधरा दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात आजही तीन ते चार दिवसांनीच पाणी येत असल्याचे वास्तव असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या पाईपलाईन कामाचे श्रेय नगरपंचायतीचे कर्मचारी व कोल्हापूर येथील ठेकेदारांचे असून, देवगड–जामसंडे शहर विकास आघाडीने घेतलेल्या बैठकीमुळेच हे काम गतीने सुरू झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक आमदार व सिंधुदुर्गचे पालकमंत्री हे राजकीय विरोधक असले, तरी दहिबाव नळयोजनेच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात कोणताही कमीपणा नाही, असे मतही सौ. ठाकुर यांनी व्यक्त केले आहे.












