फोंडाघाटचे डॉ. सुरेश भास्कर आपटे यांना जीवनगौरव; रुग्ण परिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव
फोंडाघाट (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या वार्षिक जल्लोत्सवात फोंडाघाटचे डॉ. सुरेश भास्कर आपटे यांना “जीवनगौरव” पुरस्कार, डॉ. आंबेकर व डॉ. विद्याधर तायशेटे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून क्लबचा हा सर्वोच्च पुरस्कार, निवृत्त डॉक्टर पेशातील व्यक्तीला देण्यात येतो. हा सन्मान मिळाल्यानंतर, फॅटर्निटी क्लबच्या सर्व डॉक्टर्स आणि फोंडाघाट मधील रुग्ण परिवार-ग्रामस्थांकडून डॉ. आपटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. सुरेश आपटे यांनी वडील डॉ. भास्कर आपटे यांचे नंतर, दुसऱ्या पिढीमध्ये सुमारे ५० वर्षे अखंड निष्ठापूर्वक आणि फोंडावासीयांना समर्पित वैद्यकीय सेवा दिली. पिढीच्या संस्कारांमध्ये रुग्णांचा विश्वास संपादन करून वक्तशीरपणा, चिकित्सामधील शिस्त आणि “कुटुंबाचे डॉक्टर” म्हणून रुग्णांमध्ये जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यामुळे ते ग्रामीण व निमशहरी वैद्यकीय सेवेचे आदर्श उदाहरण तर आहेच, परंतु आजच्या वैद्यकीय व्यवसायिकांकरिता मार्गदर्शक-दीपस्तंभ आहेत. आज सर्वत्र व्यवसाय आणि पैसे मिळवण्याची बजबजपुरी असताना, वैद्यकीय व्यवसायाला केवळ व्यवसाय किंवा धंदा न मानता तो सेवेचा यज्ञ मानुन अविरत रुग्ण कल्याणाकरिता कार्य करणारे, दीर्घ प्रेरणादायी सेवेसाठी हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असल्याचे क्लब कडून मानपत्रावर सूचित करण्यात आले आहे.
प्रतिकूल परिस्थितीत अडलेल्या बाळंतिणी, घाटातील अपघात ग्रस्त रुग्ण, साथीचे रोग आणि ग्रामीण भागात डोलीतून आणले जाणारे सर्पदवशांचे रुग्ण यांना गांभीर्याने, तातडीने प्रथमोपचार देऊन त्यांचे जीव वाचवले आहेत. त्यात डॉ. आपटे यांची रुग्णसेवा, मूल्यनिष्ठा, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि स्पष्ट वक्तेपणा यामुळे ते लोकप्रिय आणि सर्वांसाठी “आपले डॉक्टर” होते. व्यवसायाबरोबरच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संस्थेचे चेअरमन पद त्यांनी भूषवले होते. त्यांचे माध्यमिक शिक्षण फोंडाघाट येथे, कॉलेज शिक्षण रत्नागिरी येथे आणि सांगली-पुणे येथे वैद्यकीय शिक्षण झाले. प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण मुंबई येथे पूर्ण करताना त्यांनी गोल्ड मेडल पटकावले होते. पन्नास वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेत पत्नी डॉ. सुनीता हिची समर्थ साथ लाभली. यांच्या निवृत्तीनंतर मुलगा डॉ. शैलेंद्र आपटे ही तिसरी पिढी कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे. बिलाची परवा न करता पेशंट कसा लवकर बरा होईल या दृष्टीने औषधोपचार करणारे डॉ. आपटे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांनी रुग्णांना तिष्ठत न ठेवता “फॅमिली डॉक्टर” ही संकल्पना पुन्हा रुजवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि आपला हा सन्मान रुग्णसेवेला समर्पित केला आहे.











