खारेपाटण (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, स्नॅपचॅट, एक्स (ट्विटर) अशा विविध माध्यमांमुळे तरुणांचे विचार, वर्तन आणि जीवनशैली यावर मोठा प्रभाव पडत आहे. यातून होणारे दुष्परिणाम आजच्या तरुणाईने समजून घेणे काळाची गरज आहे असे भावपूर्ण उदगार रूपाली कदम यांनी खारेपाटण ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने नुकतीच खारेपाटण ज्युनियर कॉलेज “सोशल मिडिया व आजची तरुणाई” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रुपाली कदम बोलत होत्या. त्या जिल्हा समन्वयक – पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद इंडिया, जिल्हा प्रतिनिधी – नेक्सस इंटरनॅशनल स्कुल, जिल्हा समन्व्यक – ग्रामीण महिला बहुउद्देशीय संस्था, सिंधुदुर्ग यामध्ये काम करत असून गेली १० वर्षे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून देखील जिल्ह्यात काम पाहत आहेत. तसेच त्या महाराष्ट्र फाउंडेशनचा उपक्रमशील मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका असून रूपाली कदम Helping hand for blood, स्माईल विथ यू, चाईल्ड हेल्प फाउंडेशन, आभा परिवर्तनवादी संस्था, नेहरू युवा केंद्र, अभिनव शिक्षा केंद्र इत्यादी संस्थासोबत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून चित्रपट गीतलेखन व पार्श्व गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रपती पुरस्कारासह ५० हुन जास्त पुरस्कार प्राप्त ‘मुंघ्यार’ या लघु चित्रपटाचे गीतलेखन व गायन त्यांनी केले आहे. अशा मार्गदर्शिका रुपाली कदम यांनी खारेपाटण कॉलेजला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हीतगुज साधले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सहाय्यक शिक्षिका सारिका महिंद्रे,श्री. गुरव, स्पोकन इंग्लिश कॉर्डिनेटर प्रियांका मोरे व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











