एसटी बसचालकाच्या सतर्कतेने टळली मोठी दुर्घटना
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातात कारमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव जात होती. ओसरगाव येथे अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थेट डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसली. त्याच वेळी समोरून येणाऱ्या एसटी बससमोर कार अचानक आल्याने अपघात टाळण्यासाठी बसचालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला वळवली. मात्र कारची बसला जोरदार धडक बसली.
बसचालकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र बसच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चुरगळला गेला. कारमधील तिन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.












