ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले आहे. भारत सरकारने महाराष्ट्र राज्यातील ८९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर केली आहेत. त्यात डॉ दहिकर यांचा समावेश आहे. यामुळे सिंधुदुर्ग प्रशासकीय यंत्रणेत आणि विशेषता जिल्हा पोलिस दलात आनंद व्यक्त केला जात आहे.
२००२ मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर रुजू झाले. त्यांनी आपल्या दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सेवेच्या प्रारंभी वरोरा आणि नागपूर (ग्रामीण) उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि प्रभावी पोलीसिंगचा ठसा उमटवला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांच्या समर्पित नेतृत्वामुळे व सर्वांगीण प्रशासनामुळे या केंद्राला आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. ही त्यांच्या कार्यक्षमतेची ठळक पावती ठरली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त वाहतूक, झोन 10 व झोन 11 येथे कार्यरत असताना गुन्हे अन्वेषण, अंडरवर्ल्डमधील फरारी आरोपींचे प्रत्यार्पण, कायदा व सुव्यवस्था तसेच व्हीआयपी दौर्यांचे नियोजन यासारख्या अत्यंत जबाबदारीच्या कामकाजात त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. मुंबई एटीएसमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी अनेक दहशतवादी गटांचा पर्दाफाश करून राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी दिली. जातीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भिवंडी शहरात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी सूक्ष्म नियोजन व अचूक अंमलबजावणीच्या माध्यमातून धार्मिक सण तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडून आपली नेतृत्वक्षमता पुन्हा सिद्ध केली होती.
लोकांसाठी सहज उपलब्धता, ठाम नेतृत्व आणि सखोल कायदेशीर जाण ही त्यांची ओळख ठरली आहे. त्यांच्या या सेवाभावी वाटचालीची दखल घेत २०१९ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह त्यांना प्रदान करण्यात आले होते. आता भारत सरकारकडून जाहीर झालेल्या राष्ट्रपती पदकामुळे डॉ. मोहन दहिकर यांच्या कर्तृत्वावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमानास्पद क्षण प्राप्त झाला आहे.












