आशियेमठ श्री दत्तक्षेत्र येथे अतिरुद्र स्वाहाकाराने भक्तिमय वातावरण

151 ब्राम्हणांच्या सहभागाने होतोय अतिरुद्र स्वाहाकार

कणकवली (प्रतिनिधी) : श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे पुरातन श्री दत्तमंदिराच्या दहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘अतिरुद्र स्वाहाकार’ व धार्मिक कार्यक्रमांचा भक्तिमय वातावरणात रविवारी प्रारंभ झाला आहे. प्रारंभी प. पू. भालचंद्र महाराज ते दत्तक्षेत्र आशियेमठ पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याठिकाणी भक्तांच्या कल्याणार्थ 151 ब्राम्हणांच्या मंत्रपुष्पांजलीने अतिरुद्र स्वाहाकार मांगल्यमय निर्माण झाले आहे.

श्री दत्तक्षेत्र आशियेमठ येथे २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत अतिरुद्र स्वाहाकार होत आहे. रविवारी पहाटे ६ वाजता नित्यपूजा आणि सूर्य उपासनेने झाली. त्यानंतर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण व नंदीपूजन करून विश्वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सरपंच महेश गुरव, विलास खानोलकर, मिलिंद करंबेळकर, गुरुनाथ खानोलकर, पांडुरंग बाणे, सुनील बाणे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी भालचंद्र महाराज संस्थान येथून श्री दत्तक्षेत्र आशिये मठापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत सिंधू गर्जना ढोल पथकाच्या गजराने आणि तालबद्ध वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले. गावातील शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर मंगल कलश धारण करून सहभाग घेतला. श्री दत्तप्रभुंच्या पालखी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली. २ फेब्रुवारीपर्यंत दररोज अतिरुद्र स्वाहाकार, विविध याग, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरुद्र स्वाहाकार सोहळा समिती आशिये मठ यांच्या वतीने अध्यक्ष विलास खानोलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!