संतोष साटविलकर विरुद्ध घनश्याम ऊर्फ बाळू राणे यांच्यात थेट लढत
चौके (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणुक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होऊ घातली आहे. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. याच दिवशी सर्व मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले असून मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या मतदार संघात आता शिवसेना शिंदे सेनेचे संतोष वसंत साटविलकर विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाचे घनश्याम उर्फ बाळू गंगाराम राणे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.
या मतदारसंघाचा आढावा घेतला असता या मतदार संघात सर्वसाधारण आरक्षण जाहिर झाले होते. त्यात महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिंदे सेनेसाठी सुटल्यानंतर पेंडूर मतदार संघातील शिंदे सेनेतर्फे दीपा सावंत, राजेंद्र परब आणि महेश परब हे तीन मराठा समाजाचे उमेदवार आणि संतोष साटविलकर असे चौघेजण इच्छुक होते. त्यापैकी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले ओबीसी उमेदवार संतोष साटविलकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत पक्ष नेतृत्वाने शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का दिला. पक्ष नेतृत्वाच्या या निर्णयामुळे पेंडूर मतदार संघातील सर्वसाधारण आरक्षण असल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले दिसून आले. राजेंद्र परब आणि महेश परब यांनी अर्ज न भरताच माघार घेतली असली तरी शिंदे सेनेच्या इच्छुक उमेदवार पैकी दीपा सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच महायुती मधील भाजपचे कार्यकर्ते सुमित सावंत यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पेंडूर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवार २७ जानेवारी रोजी महायुतीच्या विशेष करून मराठा समाजाच्या अपक्ष उमेदवारांची नाराजी दूर करण्यात आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यशस्वी ठरले. आमदार डॉ. निलेश राणे यांच्या सांगण्यावरून भाजपचे अपक्ष उमेदवार सुमित सावंत आणि शिंदे सेनेचे अपक्ष उमेदवार दीपा सावंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार संतोष साटविलकर यांचा मार्ग मोकळा झाला. त्याचप्रमाणे ठाकरे सेनेचे अपक्ष उमेदवार दर्शन म्हाडगुत यांनीही आपला उमेदवारी अर्ज माजी आमदार वैभव नाईक यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर मागे घेतल्यामुळे ठाकरे सेनेचे अधिकृत उमेदवार घनश्याम उर्फ बाळू राणे यांचा मार्ग मोकळा झाला. आणि पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघात दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले.
पेंडूर मतदार संघातील ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. बाळू राणे हे राजकारणात जास्त सक्रिय नसले तरी त्यांचे वडील बाबाराव राणे यांची राजकीय कारकीर्द प्रभावशाली राहिली असल्याने आणि माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस यांना मानणारा वर्गही या मतदार संघात असल्याने त्याचा फायदा बाळू राणे यांना होण्याची शक्यता आहे.
तर संतोष साटविलकर हे राजकारण आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले तसेच पेंडूर मतदारसंघात आमदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने त्याचा फायदा संतोष साटविलकर यांना होऊ शकतो. फक्त पेंडूर मतदार संघात गेले काही दिवस जास्त चर्चेचा विषय होता तो म्हणजे सर्वसाधारण /ओपन आरक्षण असताना पक्ष नेतृत्वाने इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांना संधी दिली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या काही मराठा कार्यकर्ते तसेच मराठा समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मात्र साटविलकर यांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे. बाकी मतदार कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात हे निकाल लागल्या नंतरच समजेल. एकूणच साटविलकर विरुद्ध राणे हीं लढत रंगतदार होणार हे मात्र निश्चित.
दोन्ही पंचायत समितीच्या लढती देखील दुरंगी
पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघात वराड व पेंडूर अशा दोन पंचायत समिती येतात. या दोन्ही पंचायत समिती मध्ये देखील दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वराड पंचायत समितीमध्ये महायुतीकडून भाजपच्या कमळ ह्या चिन्हावर माधुरी मोहन मसुरकर तर प्रतिस्पर्धी म्हणून ठाकरे सेनेच्या दीक्षा देवदास रेवडेकर ह्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर पेंडूर पंचायत समिती मध्ये ठाकरे सेनेकडून सप्तशीला धामापूरकर व शिंदे सेनेच्या रिया बावकर या एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात आहेत. या लढती देखील चुरशीच्या होणार असल्याचे चित्र आहे.

संतोष साटवीलकर

बाळू राणे










