खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रवीण लोकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यानिमित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कार्यानुभव विषयाच्या विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकवर्ग यांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये एन. सी. सी. व स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. तर यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कला उत्सव २०२५ मध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी सुरज गोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित देशभक्तीपर समूहगीताचे सादरीकरण करण्यात आले होते. खारेपाटण येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्याचे सुंदर सादरीकरण यावेळी केले. उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त माननीय विजय देसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १०,००० रुपयांची देणगी संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्याकडे सुपूर्द केली. अत्यंत आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, प्रमुख पाहुणे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार दीपक लाड, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त प्रशांत गुळेकर, योगेश गोडवे, विजय देसाई, गुरुप्रसाद शिंदे, ए. डी. कांबळे, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ चे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, सर्व शिक्षकवृंद, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












