शासकीय डॉक्टरला मारहाण | आरोपी जगदीश चव्हाणला शिक्षा

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात जगदीश सुभाष चव्हाण (वय 33 वर्षे, रा. तळगाव, ता. मालवण ) याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी शिक्षा ठोठावली आहे. जगदीश चव्हाण याचा गुन्हा शाबीत झाल्यामुळे न्यायालयाने त्याला रोख 4 हजार 500 रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. खटल्याच्या सुनावणी दरम्यान एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले.

या गुन्ह्यातील फिर्यादी शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय श्रीपाद ढवळे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी जगदीश चव्हाण याने डॉ. ढवळे यांच्या शासकीय निवासस्थानी आपल्या मुलाची तपासणी करण्यासाठी डॉक्टर ढवळे यांच्यावर जबरदस्ती केली. तेव्हा डॉ. ढवळे यांनी मुलाला ओपीडी मध्ये घेऊन या तिथे तपासणी करतो असे सांगितले. याचा राग येऊन जगदीश चव्हाण याने माझ्या मुलाला येथे तपासा असे म्हणत डॉक्टर ढवळे यांच्या निवाससस्थानी अनाधिकाराने प्रवेश केला. तसेच फिर्यादी डॉ. ढवळे व साक्षीदार यांना हाताच्या थापटाने दोन्ही गालांवर मारून त्यांना ढकलले.

याबाबत डॉ. ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगदीश चव्हाण विरोधात आयपीसी 353 व अन्य कलम तसेच वैद्यकीय सेवा व्यक्ती संस्था सुरक्षा अधिनियम 3 नुसार 5 एप्रिल 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद दरेकर यांनी केला होता. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी या गुन्ह्यातील साक्षीदार यांची घेतलेली साक्ष, पुरावे आणि केलेला युक्तिवाद यामुळे आरोपी जगदीश याने केलेला गुन्हा सिद्ध झाला.

error: Content is protected !!