जिल्ह्यात सर्व तालुक्यात उर्जा मित्र बैठकांचे १८ फेब्रुवारी रोजी आयोजन आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आठही तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावण्यासाठी तसेच विज ग्राहक आणि विज अधिकारी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी तालुका स्तरावर व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विज ग्राहकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात यावे अशी लेखी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या दि. २४ नोव्हेंबर,२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य प्रा. एस. एन. पाटील यांनी केली होती. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी या मागणीची दखल घेऊन महावितरण विभागाला सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार कार्यकारी अभियंता, महावितरण कणकवली व कुडाळ यांनी तालुका व उपविभाग स्तरावर उर्जा मित्र बैठक आयोजित करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील आठही तालुका आणि उपविभाग स्तरावर बुधवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या उर्जा मित्र बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे प्रतिनिधी, विज ग्राहक आणि विज प्रशासन यांच्या मधील समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत.

या बैठकीत वीजपुरवठा, बिलिंग, मीटर दुरुस्ती, खांब-तार बदल, तक्रारींची नोंद व निकाली काढणे, तसेच विज ग्राहकांचा महावितरण अधिकाऱ्यांशी थेट संवाद होणार आहे. ग्राहकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण व्हावे, सेवा अधिक पारदर्शक व्हावी आणि विजविषयक जनजागृती वाढावी, हा या उर्जा बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. तालुका आणि उपविभाग स्तरावर होणाऱ्या या बैठकींमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही आपल्या तक्रारी मांडण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील विज ग्राहकांनी उर्जा मित्र बैठकीत सहभागी होऊन आपल्या तक्रारी, सूचना व अभिप्राय मांडावेत, ज्यामुळे वीजसेवा अधिक दर्जेदार होण्यास मदत होणार आहे. या बैठकीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!