कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्र उत्सव भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर शिवमय झाला होता. मंदिरात शिवशंभुची मूर्ती ठेवून विद्युत रोषणाई तसेच रंगीबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटेपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी उसळली होती. सकाळी श्रींची विधिवत पूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर सकाळी ९ वाजता यथार्थ पारकर दांपत्याकडून लघरुद्र विधी पार पडला. वेदघोष आणि मंत्रोच्चारांच्या निनादात वातावरण भक्तिमय झाले होते. सकाळी ९.३० वाजता श्रींच्या मंदिराभोवती पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला.
रात्री ११ वाजता ह. भ. प. किरण पारकर यांचे कीर्तन झाले. शिवमहिमेचे प्रभावी निरूपण आणि हरिनामाच्या गजरात उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनानंतर उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने उत्सवाचे सुसज्ज असे नियोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे कणकवलीतील वातावरण शिवभक्तीने भारावून गेले होते.












