शिवाजी महाराज–टिपू सुलतान तुलना वक्तव्यावर भाजपचा निषेध

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माफी मागावी; जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे. आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पहावे अशी टिप्पणी हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा असा संबोधले जाते तर टिपू सुलतान हा क्रूरकर्मा आहे. शत्रुगटातील स्त्रीला आईची उपमा देणारे शिवछत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि शत्रुगटातील स्त्रीवर अत्याचार करून त्यांना जनानखान्यात दाबून ठेवणारे सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही. शौर्याची तुलना क्रौर्याशी करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कडून मी निषेध करत आहे, असे पुढे बोलताना श्री सावंत यांनी सांगितले. खरंतर महाविकास आघाडी कडून सध्या एकत्र आलेले इतर पक्ष आणि त्यांचे नेते यांनीही याबाबतीत आपली स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची तुलना टिपू सारख्या सैतानाची करणे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान्य आहे का ? त्यांचे यावरचे मौन पाहता त्यानां ही भूमिका मान्य असल्याचे जाणवते, असा उपरोधिक टोलाही श्री सावंत यांनी विरोधकांना मारला आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात श्री सावंत यांनी, स्त्रियांना कैदी बनवू नये ही शिवछत्रपतींची विचारसरणी आणि याउलट स्त्रीयांना कैद करून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करणे ही टिपूची विचारसरणी, याची तुलना कशी काय होऊ शकते याबाबत काँग्रेस सहित इतर पक्षांनी उत्तर द्यावे. टिपू सैतानाच्या आक्रमणास तोंड देणे अशक्य होते अशा स्त्रियांनी नदीमध्ये उड्या टाकून आपल्या आयुष्य संपवले होते, अशा कटू आठवणी सोबत असताना टिपूचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्वरित माफी मागावी. महाराष्ट्र त्यांना कदापी माफ करणार नाही. सिंधुदुर्ग भाजप आणि सिंधुदुर्गवासीयां तर्फे हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध ! असे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!