नवनिर्वाचित जि. प. सदस्या प्राची ईसवलकर व पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा खारेपाटण बुद्धविहार येथे सत्कार

खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ व संघमित्रा महिला मंडळ यांचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंचशील नगर, खारेपाटण येथील बुद्धविहारात नवनिर्वाचित खारेपाटण जि. प. सदस्य प्राची ईसवलकर व पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष भरत रघुनाथ पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमाला खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे माजी अध्यक्ष यशवंत कांबळे, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रा. पं. माजी सदस्य योगेश पाटणकर, संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा संकिता पाटणकर, उपाध्यक्ष सायली तुरळकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, मंडळाचे सचिव सागर पोमेडकर, बौद्धचार्य संतोष मधुकर पाटणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्य यांच्या शुभहस्ते खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या अर्धपुतळ्याला पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

खारेपाटण बुद्धविहार येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पंचशील नगर वासियांच्या वतीने खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्य प्राची ईसवलकर यांचा पंचशील विकास मंडळाचे अध्यक्ष भरत पाटणकर यांच्या शुभहस्ते तर खारेपाटण पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांचा संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तर नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्य यांचा मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर व मधुकर पाटणकर यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

“मला आज माझ्या राजकीय कारकिर्दीत जेवढी पदे मिळालीत ती सर्व भारतीय संविधानाची देणं असून भारतीय घटनेचे शिल्पकार यांचे फार मोठे उपकार या देशावर आहेत आणि म्हणूनच मी आज एक सर्वसाधारण महिला एका गावची सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य पर्यंत पोहचू शकले.” असे भावपूर्ण उदगार जि. प. सदस्य प्राची ईसवलकर यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना काढले. तर पंचशील नगर येथील जनता नेहमीच माझ्या सोबत कायम राहिली असून मी त्यांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. मात्र मला मिळालेल्या संधीचा उपयोग प्राधान्याने येथील जनतेच्या विकासासाठी करेन असे भावपूर्ण नवनिर्वाचित सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी आपल्या सत्कार प्रसंगी काढले.

यावेळी पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्या वतीने बौद्धजन सेवा संघटनेचे अध्यक्ष यशवंत कांबळे हे प्राथमिक शिक्षक सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा देखील जिल्हा परिषद सदस्य प्राची ईसवलकर व पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पाटणकर यांनी मानले.

error: Content is protected !!