मोटारसायकल रॅली, ढोल-ताशे, कलश-लेझीम व शिवरायांची मिरवणूक
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन बुधवार १८ फेब्रुवारी आणि गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तसेच ढोल-ताशांच्या गजरात मराठमोळ्या वेशभूषेत कलश, लेझीम, लाठी-काठी प्रात्यक्षिकांसह छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत लहान-मोठे, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
गुरुवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता कलश व लेझीमसह ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता शिवपुजन व पाळणागीत, सकाळी ११ वाजता मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम, तर सायंकाळी ७ वाजता भाषणे, मनोगत आणि बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
सर्व कार्यक्रमांचे आयोजन शाळा नं. १ च्या शेजारी, गावठणवाडी, तरंदळे येथे करण्यात आले आहे.महोत्सवाच्या निमित्ताने तरंदळे गावात उत्साहाचे वातावरण असून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











