भाऊ-बहिणीने साकारली इको-फ्रेंडली सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती

इतिहासप्रेम आणि पर्यावरण जतनाचा सुंदर संगम

सावंतवाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हिंदवी स्वराज्यातील महत्त्वाचा जलदुर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग किल्ल्याची इको-फ्रेंडली प्रतिकृती साकारून येथील सेंट झेवियर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या भाऊ-बहिणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार श्रीकृष्ण सुनील मोचेमाडकर आणि इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु. स्वरा मोचेमाडकर या दोघांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून सिंधुदुर्ग किल्ल्याची आकर्षक व वास्तवदर्शी प्रतिकृती तयार केली. किल्ल्याचे बुरुज, तटबंदी, प्रवेशद्वार तसेच समुद्रातील भौगोलिक रचना यांचे बारकाईने दर्शन या प्रतिकृतीत घडविण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांच्या या सर्जनशील कामगिरीचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले असून शिवजयंतीनिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड वाढण्यासोबतच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!