नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थेमुळे अखेर सिमेंट भरलेला कंटेनर कलंडला ! मोठी दुर्घटना टळली

नदीतील पर्यायी व्यवस्थेमुळे, भविष्यात गंभीर अपघाताची शक्यता ! बांधकाम विभागावर ठपका !

सुशोभित भिंतीचा खांब कारण ठरण्याची शक्यता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : बुधवारी पहाटे अडीच वाजता, सिमेंट भरून घाट मार्गे तोंडवली कडे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या कंटेनर, समोरून येणाऱ्या चार चाकी गाडीला साईड देत असताना, गटाराचे दगड खचल्याने कलंडला. या तीन बाजूला जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे, अवजड वाहनांना वळण घेताना फार त्रास पडत आहे. प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य वाहतूक व्यवस्थेमुळे या दुर्घटनेतून भविष्यात गंभीर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यास सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील. असा इशारा स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी दिला आहे. पहाटे अडीच वाजता झालेल्या अपघातानंतर सुमारे दहा ते अकरा तासानंतर निखिल कन्स्ट्रक्शन ने कंटेनर बाजूला केला. त्यामुळे कंपनीच्या बेपरवाई बद्दल संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हरकुल मार्ग बंद राहिला.

जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग,ठेकेदार यांच्या आदेशाला फाट्यावर मारून, नदीतील पर्यायी वाहतूक रस्त्याने, अवजड वाहने वाहतूक सुरू आहे. याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे ना ग्रामपंचायतीचे ? वस्तुत: तीन दिशेला जाणारे अरुंद रस्ते वळणाच्या ठिकाणी रुंद करणे आवश्यक आहे.मात्र ते अरुंदच ठेवल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याच वळणावरून विद्यार्थ्यांना ने – आण करणाऱ्या हसणे, दाजीपूर मार्गे एसटी गाड्या ये – जा करतात. याची दक्षता घेऊन वळणे रुंद करावीत, अशी मागणी होत आहे.तसेच नदीतून पर्यायी मार्गे येणाऱ्या गाड्यांनाही ग्रामपंचायतीने सुशोभीकरणाच्या नावाखाली बांधलेल्या भिंतीचा एक खांबही कारण ठरत असल्याची बाब, स्थानिकांनी सखेद निदर्शनास आणली आहे. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ, वाहन चालक आण प्रशाले कडून करण्यात येत आहे…

error: Content is protected !!