फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीने ‘फूड फेस्टिवल (खाद्य महोत्सव)’ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासाला व उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले होते. पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, रगडा पेटिस, इडली, चिकन बिर्याणी, चिकन 65, चिकन मंचूरियन, लस्सी, चहा, विविध प्रकारचे शरबत आदी स्वादिष्ट पदार्थांचा समावेश होता. आकर्षक सजावट व स्वच्छतेची विशेष काळजी घेत विद्यार्थ्यांनी आपापले स्टॉल्स उभारले होते.
आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संतोष रायबोले यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणे, व्यवहारज्ञान वाढवणे तसेच लघुउद्योगाची संधी ओळखण्याची क्षमता विकसित करणे हा या फूड फेस्टिवलचा मुख्य हेतू आहे.
फूड फेस्टिवलचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी दाखवलेली कल्पकता, नियोजनकौशल्य आणि सहकार्याची भावना यांचे कौतुक केले. शिक्षणासोबतच अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. खाद्य संस्कृती ही केवळ चवीपुरती मर्यादित नसून ती उद्योजकतेचा एक प्रभावी मार्ग ठरू शकते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळून भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत होते.या फूड फेस्टिवलमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल फोंडाघाट येथील विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.












