विवाहित महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी

कणकवली (प्रतिनिधी) : विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने घेतलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी मुबारक शहाबुद्दीन साटविलकर ( वय 30 वर्षे, रा नांदगाव खालची मुस्लीमवाडी , ता. कणकवली ) याला कणकवली पोलिसांनी अटक केली.त्याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी की, आरोपी मुबारक साटविलकर याने आपल्या ओळखीतल्या एका विवाहित महिलेसोबत जबरदस्तीने फोटो घेतला होता. तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी मुबारक याने पीडित महिलेशी तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मार्च 2023 ते मे 2025 दरम्यान च्या कालावधीत आरोपीने तालुक्यातील काही लॉजवर नेऊन बलात्कार केला. याबाबत पीडित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात 11 फेब्रुवारी रोजी फिर्याद दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे शीघ्र हालचाली करत आरोपी मुबारक याला 12 फेब्रुवारी रोजी अटक केली. महिला पीएसआय वृषाली बर्गे यांनी आरोपी मुबारक याला कणकवली न्यायालयात हजर करत अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेत न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली.दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी मुबारक याला 17 फेब्रुवारी पर्यंत 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान 17फेब्रुवारी रोजी आरोपी मुबारक याला पुन्हा कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी मुबारक याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.

error: Content is protected !!