छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा शिवस्मारक कुळाचीवाडी शिव साम्राज्य प्रतिष्ठान येथे उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे शिवशंभू सामाजिक कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट (कुळाची वाडी) येथील शिवाजी चौक येथे शिवजन्मोत्सवाचा सोहळा प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. सह्याद्रीच्या कडे कपारीची पार्श्वभूमी लाभलेल्या येथील निसर्गरम्य परिसरात हर हर महादेव | जय भवानी | जय शिवाजी च्या बुलंद घोषणा प्रतीध्वनीत झाल्या. चौकापासून स्मारकापर्यंत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी आणि तोफ गोळ्यांच्या वर्षावात छ. शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी अबालवृद्धांचा जोश आणि घोषणांनी परिसर निनादला. छत्रपतींचे मूर्तीपूजन वाडीतल्या मान्यवरांचे हस्ते पार पडल्यावर, उपस्थितांनी मानवंदना दिली. बीडवाडी ग्रुप उंबरणे यांनी मल्लखांब, लाठीकाठीची चित्तथरारक,रोमांचक प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. त्यानंतर श्रीसत्यनारायण पूजा, आरती, महाप्रसाद संपन्न झाला. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व त्यानंतर स्थानिक मंडळाची भजने पार पडली. रात्र चेंदवणकर- गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचा “कालसर्प तांडव” हा बहारदार नाट्यप्रयोग सादर झाला. सलग पाचव्या वर्षी मंडळाच्या उपक्रमाला युवाई, महिला- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…

शिवसाम्राज्य प्रतिष्ठान फोंडाघाट
ऊर्जा – उत्साह- नियोजनबद्ध कार्यक्रम यासाठी सुप्रसिद्ध ठरलेल्या फोंडाघाटच्या शिवसाम्राज्य प्रतिष्ठान मंडळाने शिवगडावर पहाटेच ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रम स्थळी आणली. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन आणि मानवंदना आणि बुलंद घोषणांनी तसेच छत्रपतींच्या शौर्याच्या पोवाड्यांनी आसमंत दुमदुमून गेला.
संध्याकाळी असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीत, स्वीट लँड कॉन्व्हेंट स्कूल– तरळे च्या विद्यार्थी, विद्यार्थिनी, मार्शल आर्ट्स, आणि शिक्षकांच्या सहभागातून चित्तथरारक, धाडसी अन् साहसी लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सर्वांचे आकर्षण ठरले. रात्री शिवभजनांनी आणि गजरांनी एसटी स्टँड निनादला…













