बांदा-दाणोली मार्गावर तिलारी पाण्याचा लोंढा

विलवडे परिसरात रस्त्यावर पाणी; नागरिकांची नाराजी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तिलारी प्रकल्पाच्या बांदा शाखा कालव्याला गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र, हे समाधान फार काळ टिकले नाही. कालव्याला ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे आता शेतात आणि थेट मुख्य रस्त्यावर पाणी साचू लागले आहे. बांदा-दाणोली मार्गावर विलवडे तिठयाच्या खाली कालव्याचे पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरून वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कालव्याच्या भिंतींमधून पाणी झिरपत असल्याने शेतात पाणीच पाणी झाले आहे. आता ही गळती इतकी वाढली आहे की पाण्याचे लोंढे थेट रस्त्यावर येत आहेत. यामुळे रस्त्यावर सतत पाणी साचून राहिल्याने रस्ता खराब होत असून दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. निसरड्या रस्त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करत वाहनधारकांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची योग्य डागडुजी न केल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एकीकडे पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरत असताना, दुसरीकडे गळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय आणि सार्वजनिक रस्त्याची होणारी दुरवस्था थांबवणे गरजेचे आहे. तिलारी पाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कालव्याचे लिकेज बंद करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!