कणकवलीतील इलेक्ट्रिक व्यावसायिक राजू आजगावकर यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील प्रतिथयश इलेक्ट्रिकल्स व्यावसायिक व आशिये गावचे रहिवासी व मूळ हरकुळ बुद्रुक येथील राजेश महादेव आजगावकर (55) यांचे काल गुरुवारी आकस्मिक निधन झाले. हरकुळ येथील त्यांच्या बागेतील घरी ते दुपारी गेले असता तेथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगण्यात येते. रात्री उशिरापर्यंत ते आशिया येथे घरी परतले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता ते हरकुळ बुद्रुक येथे मृत स्थितीत आढळले. त्यानंतर त्यांना लगेचच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कणकवली शहरात बस स्थानकाच्या बाहेर राजेश आजगावकर यांनी गजानन इलेक्ट्रिकल या दुकानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. या दुकानाच्या ठिकाणाहून व्यवसाय करत असतानाच सामाजिक कार्याची देखील बांधिलकी त्यांनी जपली होती. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजसेवा मंडळ कणकवलीच्या अनेक विविध उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय व हिरीरीने सहभागी होत असत. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे मोठे योगदान होते. राजू आजगावकर यांचे दुकान म्हणजे ते समाजासाठी संपर्क कार्यालय होते. निरपेक्ष भावनेने त्यांनी समाजासाठी मोठे काम केले होते. सामाजिक सांस्कृतिक चळवळीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान कणकवलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजू आजगावकर यांच्या निधनामुळे कुडाळदेशकर समाज बांधवांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!