सावंतवाडी (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सावंतवाडीत आज शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी राहुल गांधी यांचा पुतळा जाळून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.
अमेरिका आणि भारत करारावर बोलताना पंतप्रधानांबाबत वापरलेल्या अपशब्दांचा हा निषेध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. भारत-अमेरिका व्यापार करार आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधींनी केलेल्या आंदोलनाच्या तसेच वापरलेल्या अपशब्दांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान समोर जमलेल्या शिवसैनिकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पुतळ्याचे दहन केले.
या निषेध आंदोलनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख परब यांच्यासह शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख अॅड. निता सावंत-कविटकर, लतिका सिंग, युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, रियाज खान यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.












