तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे ग्रामपंचायत आणि तळेरे ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रत्नसिंधु कराओके स्पर्धेत शिरोडा येथील प्रशांत हाडकी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेला 27 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन झाल्यानंतर प्रथितयश डॉक्टर आणि व्याख्याते डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून देत त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि सर्वसामान्य माणसांबद्दल असणारी आस्था याबाबत सविस्तर विवेचन केले. यावेळी तळेरे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू जठार, निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, मारुती वळंजू, अशोक तळेकर, तेजस जमदाडे, प्रवीण वरुणकर, सुयोग तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, शशांक तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री क्लासेस आणि श्रावणी कम्प्युटर एज्युकेशन्सच्या मुलांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित वेशभूषा साकारून ते पात्र उभे केले. तर लाठ्याकाठ्या प्रात्यक्षिके दाखविली. यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सायंकाळी आयोजित केलेल्या रत्नसिंधु कराओके स्पर्धेला स्पर्धकांनी रंगत आणली. दोन फेरीत सादर झालेल्या या स्पर्धेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 27 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे…
प्रथम : प्रशांत हाडकी (शिरोडा), व्दितीय : शांताराम साटेलकर (म्हापण), तृतीय : ओम खटावकर (तळेरे) तर उत्तेजनार्थ गौरेश घावनळेकर (घावनळे), रुपेश कल्याणकर (लोरे), सुनील गोवेकर (कणकवली) यांना अनुक्रमे रोख रक्कम 5001, 3001, 2001 व उत्तेजनार्थ प्रत्येकी रोख रुपये 1001 आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण विश्रांती कोयंडे यांनी केले. स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, शशांक तळेकर, ओम वाड्ये, अविनाश वाडये, नीलेश तळेकर, मनोज तळेकर, सदानंद तळेकर, निलेश सोरप, मंगेश मुद्रस, सतीश मदभावे, जामसंडे हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संजय पांचाळ, विश्वनाथ पेडणेकर, राजा सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.












