कुर्ली बोंडकवाडी येथे खुल्या विहिरीत पडून गवारेड्याचा मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : कुर्ली येथील बोंडकवाडी परिसरातील जंगल भागात असलेल्या खुल्या विहिरीत पडून सुमारे सात ते आठ वर्षांच्या गवा रेड्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

कुर्ली जंगल परिसरातील बोंडकवाडी येथे एक खुली विहीर आहे. या ठिकाणापासून काही अंतरावर गावातील पाटील कुटुंबाचे घर असून, या विहिरीचे पाणी ते पिण्यासाठी वापरतात. शुक्रवारी सायंकाळी विहिरीत गवा रेडा पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वन विभागाला याबाबत माहिती दिली.
रात्रीच्या वेळी घटनास्थळी जाणे शक्य नसल्याने शनिवारी सकाळी वनपाल हरी लाड, वनरक्षक नंदू लोखंडे व विनायक कमलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सुमारे १५ ते २० फूट खोल विहिरीत मृतावस्थेत असलेल्या गवा रेड्याला बाहेर काढण्यासाठी कणकवली येथील वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने दोरीच्या साहाय्याने गवा रेडा विहिरीतून बाहेर काढला.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बनसोडे यांनी गवा रेड्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत गवा रेड्याचे दहन करण्यात आले.
पाणी पिण्यासाठी गवा रेडा विहिरीजवळ आला असावा. त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी गावचे पोलीस पाटील प्रदीप पाटील, माजी उपसरपंच प्रदीप पाटील, सूर्यकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!