डोक्यात शिवराय अन् मनगटात शंभूराजे जपल्यास यश हमखास! : शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

पनवेल येथे शिवजयंतीनिमित्त धगधगते व्याख्यान संपन्न!

सावंतवाडी (प्रतिनिधी) : अलीकडे छत्रपती शिवरायांना आणि छावा शंभूराजे यांना आपली युवाई फॉलो करत आहे, याचा नक्कीच सार्थ अभिमान वाटतो. मात्र स्वराज्याचे हे दोन्ही छत्रपती केवळ डोक्यावर घेऊन नाचणे महत्त्वाचे नसून ते आपल्या डोक्यात घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवरायांची युक्ती आणि महापराक्रमी शंभूराजांचे शौर्य अंगी बाळगले तर कोणतेही क्षेत्र गाजवता येते आणि यश हमखास मिळविता येते, असे उद्गार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी काढले पनवेल येथील आयोजित व्याख्यानात प्रा. पाटील बोलत होते.

केदार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) व केदार सोसायटी सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी सायंकाळी प्रा. रुपेश पाटील यांचे “शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घालायला शिका!” या विषयावर धगधगते व्याख्यान संपन्न झाले.

प्रा. रुपेश पाटील पुढे म्हणाले, शिवरायांनी संपूर्ण आयुष्यात अंधश्रद्धेला स्थान दिले नाही. त्यांची बहुसंख्या युद्धे आणि मोहिमा या अमावस्येच्या दिवशीच संपन्न झालेल्या दिसतात. शिवरायांनी रयतेचे स्वराज्य घडवले म्हणून त्यांना ‘जाणता राजा’ ही उपाधी दिली जाते. स्वराज्याच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली दिसत नाही. यावरून शिवरायांची दूरदृष्टी समजून घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांनी बलाढ्य अफजलखान कसा फाडला हे आपण व्यवस्थित समजून घेतल्यास आपल्याला त्यांचे सूक्ष्म व्यवस्थापन लक्षात येते. दरम्यान श्री. पाटील यांनी व्याख्यानातून अफजलखानाचा वध, घोडखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा महापराक्रम तसेच शिवा काशिद यांची निष्ठा असे अनेक ऐतिहासिक प्रसंग आपल्या ओघवत्या शैलीतून उपस्थित शिवप्रेमींसमोर उलगडून दाखवले.

दरम्यान केदार सहकारी गृहनिर्माण संस्था व केदार सोसायटी सोशल असोसिएशन यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. यात सकाळी शिवज्योआगमन सोहळा तसेच रक्तदान शिबीर व सायंकाळी भव्य मिरवणूक आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. शिवजयंती निमित्त आयोजित संपूर्ण कार्यक्रमात सोसायटीमधील माता भगिनी तसेच चिमुकले शिवप्रेमी यांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
शिवजन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी केदार सोसायटी व सोशल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व शिवप्रेमी बांधवांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!