शिवरायांच्या विचारांचा जागर ; तरंदळेकरांनी घडवला ऐक्याचा आदर्श
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई–गोवा महामार्गापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तरंदळे गावात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला. गावातील सर्व समाजघटकांच्या एकोप्यामुळे हा सोहळा विशेष ठरला.
या शिवजयंती महोत्सवाची सुरुवात १८ फेब्रुवारी रोजी सकाळी तरंदळे ग्रामपंचायत येथे आयोजित आरोग्य शिबिराने झाली. संध्याकाळी ३ वाजता मोटरसायकल, रिक्षा, टेम्पो, जीप अशा विविध वाहनांची भव्य रॅली काढण्यात आली. गावातील प्रत्येक वाडीतून ही रॅली फिरत असताना तरुण युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. परगावी नोकरी-व्यवसाय करणारे चाकरमानीही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता कुंभारवाडी येथून गावाच्या सीमेवरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक मराठमोळा वेश परिधान करून ढोल-ताशांच्या गजरात लेझीम, टाळ नृत्य, कलश नृत्य सादर करण्यात आले. गावातील रस्ते भगवामय झाले होते. शिवरायांविषयी असलेली लोकांची आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा सर्वत्र जाणवत होता. काही उत्साही शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह मिरवणुकीत सहभाग घेतला.
मिरवणूक गावातील विजयस्तंभाजवळ पोहोचल्यावर दुसऱ्या महायुद्धात सहभागी होऊन हुतात्मा झालेल्या गावातील वीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक शाळेजवळ आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन व आरती करण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, लेखन, निबंध, बुद्धिमापन, चित्रकला, रांगोळी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दुपारी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. पुढे स्पर्धांतील विजेत्यांचा गुणगौरव करण्यात आला. स्थानिकांनी मनोगते व्यक्त करत छत्रपतींच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्यानंतर गावातील महिला व पुरुषांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक रंगतदार झाले.
या संपूर्ण शिवजयंती उत्सवात गावातील ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधोरेखित झाला. कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांच्या आर्थिक व श्रमदानातून हा महोत्सव यशस्वी झाल्याचे शिवजयंती उत्सव तरंदळे समितीने सांगितले. गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने दिलेल्या सहकार्यामुळे प्रथमच साजरा झालेला हा शिवमय सोहळा अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.












