फोंडाघाट (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट आणि डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसह परिसरातील महिलांच्या विविध आजारांची तज्ज्ञ व निष्णात डॉक्टर कडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये मेडिसिन विभागामार्फत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुस व किडनीचे आजार यांची तपासणी होणार असून अस्थिरोग विभागामार्फत हाडांचे आजार, मणक्यांचे विकार, मानदुखी, पाठदुखी व कंबरदुखी यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच सर्जरी व मूत्ररोग विभागाकडून मूत्रविकार, पोटाचे विकार व प्रोस्टेट ग्रंथी यांची तपासणी केली जाईल. स्त्रीरोग विभागाकडून गर्भाशय व स्त्रियांच्या इतर आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. कर्करोग विभागाकडून छाती, स्तन, गर्भाशय व आतड्यांच्या कर्करोगाबाबत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच नेत्ररोग विभागाकडून डोळ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. शिबिरामध्ये तपासणीसह आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधोपचार देखील दिले जाणार आहेत.
या उपक्रमाचा लाभ फोंडाघाट व पंचक्रोशीतील सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. विनोदसिंह पाटील (मो. ९४२१२३५८०४) व प्रा. जगदीश राणे (मो. ९३७०८५७६०६) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.











